रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (08:44 IST)

Maharashtra HSC RESULT: बारावीचा निकाल आज, कुठे आणि कसा पाहता येणार निकाल?

Maharashtra HSC RESULT
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच HSC बोर्डाचा निकाल 8 जूनला जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
 
https://www.mahahsscboard.in/ आणि www.hscresult.mkcl.org या दोन वेबसाईटवर विद्यार्थी दुपारी 1 नंतर आपला निकाल पाहू शकतात.
 
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पाहता येतील.
 
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. "महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.8 जून,2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल." अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
 
कोरोना आरोग्य संकटात दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच बारावी HSC बोर्डाची परीक्षा ऑलाईन पद्धतीने घेण्यात आली.
 
कोरोना काळात दोन वर्ष परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. शाळाही बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांसाठीही आव्हानं वाढली होती, अशा परिस्थितीत बोर्डाची परीक्षा देण्याचं टेंशन विद्यार्थी आणि पालकांना होतं.
 
बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत सुरू होत्या. यंदा राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी 8 लाख 17 हजार 188 मुलं आणि 6 लाख 68 हजार 3 मुली आहेत.
 
या सर्व विद्यार्थ्यांसाठी बारावीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या निकालाच्या आधारेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळतो.
 
शिवाय, वैद्यकीय, इंजिनिअरींग, आर्कीटेक्चर, नर्सींग, अशा विविध क्षेत्रात प्रवेशासाठीही सीईटीसोबतच बारावी परीक्षेलाही महत्त्व असतं.