शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (18:03 IST)

ममता बॅनर्जी-शरद पवार भेट : भाजपविरोधात आम्ही एकत्र, नेतृत्व कोण करेल ही दुय्यम बाब'

"नेतृत्व महत्त्वाचं नाही. कुणाच्या नेतृत्वात एकत्र यायचं, यापेक्षा भाजपविरोधात ताकदीनं उभं राहण्याची गरज आम्हाला वाटते," असं शरद पवार म्हणाले. ममता बॅनर्जी यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट झाल्यानंतर पवार आणि ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, फॅसिस्टविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं.
 
ज्यावेळी ममता बॅनर्जींनी यूपीएबद्दल विचारलं असता, त्या म्हणाल्या, "काय आहे यूपीए? आता यूपीए नाहीय."
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत बैठक झाली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हेही उपस्थित होते.
 
या भेटीनंतर सिव्हर ओक बंगल्याबाहेरच ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, "पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे."
 
ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर करण्याचा विचार मांडला होता. यासाठी त्या देशातील विविध राज्यांचा दौरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी महाराष्ट्रात मुंबई दौरा करत असल्याचं म्हटलं जात आहे.
 
मंगळवारी (30 नोव्हेंबर) ममता बॅनर्जी यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने दोन्ही नेत्यांची भेट टळली.
 
ममता बॅनर्जी यांचा हा दौरा राष्ट्रीय राजकारणाच्यादृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. तृणमूल कांग्रेस आणि विशेषतः ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं देशातील इतर राज्यांमध्ये पाय पसरण्याची घाई करत आहेत, त्यावरून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे जाणवत आहेत, असं अभ्यासकांचं मत आहे.
ममता बॅनर्जींच्या या दोन्ही भेटी राजकीय वर्तुळात आधीच सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना बळ देणाऱ्या ठरतायेत.
 
पश्चिम बंगालमधील एकतर्फी विजयानंतर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल पक्षाच्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
 
एकीकडे इतर पक्षातल्या दिग्गजांना तृणमूलमध्ये प्रवेश दिला जातोय, तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या बाहेर पडत इतर राज्यात स्वबळावर निवडणुकीत उतरण्यासही तृणमूलनं सुरुवात केलीय.
 
या दोन्ही गोष्टींसाठी गोवा ताजं उदाहरण. काँग्रेसचे नेते आणि गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यालाच पक्षात घेत तिथल्या आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीनं तृणमूल उतरताना दिसतेय.
 
आधी पश्चिम बंगालपुरतं मर्यादित मानल्या गेलेल्या ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच, राज्याबाहेरील राजकीय हालचाली वाढवल्या आहेत.