९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 'मुंबई मुलुंड'
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुंबईत मुलुंड येथे होणार आहे. १३ ते १५ जून या कालावधीत पार पडणारे हे संमेलन, नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास नाट्यसंकुल परिसरात होईल. ९८वे नाट्य संमेलन मुंबईमध्ये होणार हे ठरल्यापासून, मुंबईत ते नक्की कुठे होणार, याची उत्सुकता होती. नाट्य परिषदेने हे संमेलन मुलुंड येथे होणार असल्याचे जाहीर करत, संमेलन स्थळ निश्चित केल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली.
नाट्य परिषदेने नाट्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मांडायच्या ठरावांविषयी सूचना केल्या आहेत. सदर ठराव सूचक व अनुमोदक यांच्या स्वाक्षरी व नावांसहित १२ मे २०१८ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात पाठवायच्या आहेत. १३ मे २०१८ रोजी होणाऱ्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सभेत हे ठराव चर्चेकरिता व मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत.