शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (08:31 IST)

उत्तर महाराष्ट्रातील माजी आमदारासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेवून जाणारा पक्ष असून भाजपने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले. लोकांचा आता भाजपवरचा विश्वास उडाला असून काँग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे हे लोकांना पटल्यानेच धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी मिळून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानाने फडकत राहील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. नाना पटोले यांच्या उपस्थितीत धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 
 
काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा असे, आवाहन पटोले यांनी केले.
 
नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरु असून काँग्रेसला महाराष्ट्रात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांसाठी सर्वजण त्यांच्यासोबत आहेत. भाजपला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असे बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.