नारायण राणेंना क्षमता पाहून मंत्रिपद दिले : फडणवीस
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या नारायण राणेंना क्षमता पाहून मंत्रिपद दिले असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला चांगली खाती आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाशिक येथे महापालिकेच्या सिटीलिंक शहर बससेवेचे उदघाटन गुरूवारीफडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार असो की पद नियुक्ती याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतला जातो. त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही.
राज्यात शिवसेनेला डिवचल्याचे फळ राणेंना मिळत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटू लागल्यानंतर देवेंद फडणवीस यांनी या आरोपांचे खंडन केले. त्यांची क्षमता पाहून मंत्रिपद मिळाले असल्याचे ते म्हणाले. राणेंना केंद्रात घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील युतीच्या चर्चेची शक्यता मावळली आहे का? असे विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, अशा चर्चेने काही होत नसल्याचे ते म्हणाले.