मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (08:10 IST)

फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करून नवाब मलिक स्वतःची कबर खणत आहेत – चंद्रकांत पाटील

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी नवाब मलिक यांचे गैरव्यवहार उघडकीस आणल्यानंतर मलिक सैरभैर झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आणि खोटारडे आरोप करून ते स्वतःची कबर स्वतःच खणत आहेत. आम्ही सर्वजण एकजुटीने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहोत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले की, नवाब मलिक हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करणार होते, पण त्यांनी प्रत्यक्षात फुसके आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवाब मलिक हादरले आहेत आणि सैरभर झाले आहेत. टाडाच्या आरोपींकडून कवडीमोल किंमतीने जमीन खरेदी केल्याचे ते स्वतःच मान्य करत आहेत.
 
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हेगारांना मदत केल्याचा आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा आरोप केला. भारतीय जनता पार्टी हा आरोप स्पष्टपणे फेटाळते. भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
 
देवेंद्र फडणवीस यांनी आता एकाच विषयाची माहिती उघड केली आहे. त्यांच्याकडे अधिक माहिती आहे. ते त्यांच्याकडे असलेली माहिती योग्य यंत्रणांकडे सादर करणार आहेत. त्यानुसार जी चौकशी आणि कारवाई होईल त्याला तोंड देण्याचा विचार नवाब मलिक यांनी करावा. कोणावर तरी निष्ठा दाखविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत नवाब मलिक खड्ड्याच्या दिशेने धावत आहेत, असे पाटील म्हणाले.
 
ते म्हणाले की, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना पाठिंबा देण्याने राजकारण होत असेल तर भाजपा ते राजकारणही करेल. राज्य सरकारने गेल्या 17 महिन्यांचा पगार द्यावा आणि पंधरा हजार रुपये बोनस द्यावा, या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ताबडतोब मान्य केल्या पाहिजेत आणि त्यांच्या इतर मागण्यांबाबतही चर्चा केली पाहिजे.