मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (21:11 IST)

राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत! देशमुखांनंतर आता नवाब मलिक यांनाही कोर्टाचा दणका; याचिका फेटाळली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत आल्याचे  पुन्हा एकदा स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या ४ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मलिक यांची जामीन अर्जाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी आणि माजी मंत्र्यांना आता तुरुंगातच रहावे लागणार आहे.
 
मलिक यांच्या विरोधात सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) कारवाई सुरू आहे. त्याचअंतर्गत ते सध्या तुरुंगात आहेत. याविरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि जामीनाची मागणी केली. तसेच, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचेही याचिकेत म्हटले. मात्र, मलिक यांचा हा दावा चुकीचा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ईडीच्यावतीने कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तूर्त तरी तातडीचा कुठलाही दिलासा मलिक यांना मिळणार नाही, हे स्पष्ट होत आहे.