1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

२८ फेब्रुवारीला मुंबई राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा

NCP launches Hallabol 2
राज्य सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून २८ फेब्रुवारी रोजी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मुंबईत हल्लाबोल यात्रा काढण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. त्याचबरोबर नोव्हेंबरच्या सुमारास राज्यभरातील हल्लाबोल यात्रेचा समारोप म्हणून मुंबईत एक मोठी हल्लाबोल यात्रा काढण्यात येईल, असेही तटकरे यांनी सांगितले.
 
उत्तर महाराष्ट्रात १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या काळात हल्लाबोल यात्रा पार पडली. तरुणाईमध्ये  सरकारविरोधात प्रचंड रोष असल्याचे हल्लाबोल यात्रेत अनुभवास आले. नोकरभरती कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे तरुण चिडलेले आहेत. त्याचबरोबर शेतकरी वर्गही संतप्त आहे. हल्लाबोल यात्रेच्या काळात मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. धर्मा पाटील यांनी ज्या कारणासाठी आत्महत्या केली तो प्रश्न अद्यापही तडीस लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबाने त्यांच्या अस्थींचे विसर्जन केलेले नाही, ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका तटकरे यांनी केली.
 
उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपासाठी नाशिकमध्ये १० मार्चला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.