मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (22:13 IST)

सरकारने नव्हे तर भाजपाच्या 'एका' मंत्र्यामुळे खूप त्रास झाला, डॉ. लहाने यांचे स्पष्टीकरण

Ophthalmologist and Director of Medical Education Dr. Tatyarao Lahane
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारने नव्हे तर भाजपाच्या एका मंत्र्यामुळे खूप त्रास झाल्याचे स्पष्टीकरण नेत्रतज्ज्ञ व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले. वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार डॉ. लहाने यांना समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात भाजपाच्या एका मंत्र्याने आपल्याला त्रास दिला असे आपले म्हणणे होते. त्याऐवजी फडणवीस सरकारने त्रास दिल्याचे वृत्त आल्याचे डॉ. लहाने म्हणाले.
 
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी आपल्याला कायमच पाठिंबा दिला व सहकार्य केले. तेव्हाचे विरोधी पक्षनेते व आताचे मंत्री धनंजय मुंडे हेही कायम आपल्या पाठीशी उभे होते. फडणवीस सरकारच्या काळात ‘नेत्रदानाचा महायज्ञ’ ही संकल्पना राबविता आली. तसेच नेत्रतज्ज्ञ म्हणून अनेक उपक्रम राबविता आल्याचे डॉ लहाने यांनी यावेळी सांगितले. फडणवीस सरकारच्या सुरुवातीच्या काळात एका मंत्र्यामुळे आपल्याला त्रास झाला होता. मात्र तेव्हाही देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन माझ्या पाठीशी उभे होते, असे डॉ. लहाने यांनी यावेळी सांगितले.