राजू शेट्टीना विधानपरिषदेवर पाठवण्याची ऑफर ?
येत्या ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनाच विधानपरिषदेवर पाठवण्याची ऑफर दिल्याने राज्यपाल नियुक्त जागा असल्या, तरी या नियुक्तीवर चर्चा सुरू झाली आहे.
आधी भाजप, आता राष्ट्रवादी?राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: जयंत पाटील यांना राजू शेट्टींची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पाठवल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमध्ये प्राथमिक कारण जरी राजू शेट्टींच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचे असले, तरी तिथे राजू शेट्टींना देण्यात आलेल्या ऑफरविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. याआधी राजू शेट्टी यांच्यासोबत असलेल्या सदाभाऊ खोत यांना भाजपने त्यांच्या कोट्यातून विधान परिषदेची जागा दिली होती. आता तशाच प्रकारची ऑफर राजू शेट्टींना देखील देण्यात आली असल्यामुळे आता याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. याआधी राजू शेट्टी भाजपसोबत होते. मात्र, भाजपशी मंत्रिपदावरून आणि अपेक्षित जागांवरून वाजल्यानंतर त्यांनी भाजपशी फारकत घेतली. मधल्या काळात राजू शेट्टींनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेसाठी देखील सकारात्मक भूमिका घेतली होती.