शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (07:57 IST)

'या' दिवशी नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले आमदार नाना पटोले १२ फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यासोबत व नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्षही  दुपारी २.३० वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.
 
१९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून 'चलो जावो' 'भारत छोडो' हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. ते महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत माजी प्रांताध्यक्ष, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील.
 
या कार्यक्रमाला राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.