पंकजा मुंडेंच्या ‘शिवशक्ती’ यात्रेला सुरुवात
मुंबई : दोन महिन्यांचा राजकीय ब्रेक घेणा-या पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. मात्र, या वेळी त्यांनी राज्यात शिवशक्ती यात्रा काढत धार्मिक स्थळांना भेटी देण्याची तयारी केली आहे. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी पंकजा मुंडे यांनी श्रीक्षेत्र माहूर गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेतले. या दरम्यान त्या नांदेड विमानतळावरून माहूरला रस्ते मार्गाने पोहोचल्या. मार्गात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष राजकीय घडामोडींमध्ये सहभागी न होता, शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून लोकांना भेटणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यभरात अकरा दिवसांच्या या दौ-यात त्या दहा जिल्ह्यांतील त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर अडगळीत टाकल्याची भावना पंकजा मुंडे यांच्या मनात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली होती. आपण या संदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तरी देखील भाजपमध्ये कोणतीच हालचाल न झाल्याने अखेर दोन महिन्यांचा ब्रेक घेत त्यांनी चर्चा कमी करण्याचा प्रयत्न केला होता.