गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पालघर , मंगळवार, 29 जून 2021 (09:01 IST)

चौघांच्या अंगावर वीज कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर यांसह अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यात गुरे चारण्यासाठी गेलेल्या चौघांच्या अंगावर वीज पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.  
 
एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती स्थिर
डहाणू तालुक्यातील ओसरविरा मानकर पाड्यात दुपारी 4 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी वीज अंगावर पडून रविंद्र बच्चू कोरडा (15) याचा जागीच मृत्यू झाला. तर मेहुल अनिल मानकर (12), चेतन मोहन कोरडा (11), दिपेश संदीप कोरडा (14) या तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या या तिघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना जवळच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
ही चारही मुले ओसरविरा येथील मानकर पाड्यातील आहेत. काल हे चौघेजण गुरे चारण्यासाठी शेतावर गेले होते. मात्र शेतातच वीज पडून रविंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले.