बीड जिल्ह्यात राजकीय खळबळ; पंकजा मुंडेंना धक्का
महाराष्ट्राच्या राजकारणात एकानंतर एक सूचक घडामोडी घडत असतानाच मराठवाड्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची घटना घडली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याच साखर कारखान्यावर छापेमारी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे.
आज सकाळी १० वाजेपासून जीएसटीचे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले होते. विशेष म्हणजे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे बंधू-भगिनी एकाच कार्यक्रमात उपस्थित असताना तिकडे परळीत सकाळी जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु केली.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच GST विभागाकडून ही कारवाई होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपविरोधी नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात, असा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमी करण्यात येतोय. आता भाजप नेत्या आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याच साखर कारखान्यावर छापेमारी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे. मात्र नेमकी कोणत्या कारणासाठी ही चौकशी सुरु आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. भाजपचे दिग्गज नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान भगवान गडाच्या पायथ्याशी नुकत्याच पार पडलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे व त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी आपल्यातील राजकीय वैर संपल्याचे घोषित केले होते. या कार्यक्रमात बोलताना भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी ‘पंकजाने अहंकार सोडावा’ असे म्हटले होते.त्यावर पंकजांनी आपल्यात कसलाही अहंकार नाही, माझी उंची आणि आवाज मोठा आहे! असे प्रत्युत्तर त्यांना दिले होते. बहिण भावांनी आपसातील राजकीय वैर संपल्याची घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकजा यांच्या कारखान्यावर धाड पडल्याने आता राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor