बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

आता मनसे महाआघाडीत दाखल होण्याची शक्यता

राज ठाकरे यांचा करिश्मा असलेली मनसेचा लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून भाजपवर जोरदार टीका करणार्‍या राज ठाकरे यांचे मनसे महाआघाडीत दाखल होण्याचे जवळपास निश्‍चित झाले असे चित्र आहे. 
 
मनसेसाठी स्वतःच्या कोट्यातील कल्याणची जागा सोडण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखवली आहे. तर कॉंग्रेसनेही मनसेला एक जागा सोडावी, असा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आला आहे. मनसेला विरोध करणार्‍या काँग्रेस नेत्यांशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः बोलणार असल्याचे समजते आहे. 
 
काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजपविरोधात महाआघाडी केली आहे, मात्र  महाराष्ट्रातून अन्य पक्षांना साथीला घेण्यात या पक्षांना फारसे यश आलेले दिसत  नाही. शरद पवार आणि राज ठाकरे मात्र परस्परांच्या संपर्कात होते. कल्याणसह आणखी एक लोकसभेची जागा मिळावी, अशी अपेक्षा राज यांनी पवारांकडे व्यक्‍त केली असून, काँग्रेसने मुंबईतील एक जागा मनसेला सोडावी, असा पवार यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जर मनसे महाआघाडीत गेली तर मोठा धक्का युतीला बसणार आहे.