रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जानेवारी 2020 (17:38 IST)

पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये टोळ नाक्याचा राडा ; रॉडने १८ वाहनांची केली तोडफोड

पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील संजय गांधी नगरमध्येही तोडफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात टोळक्याने १८ वाहनांची तोडफोड करून सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे. 
 
याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्र घेऊन आलेल्या समाजकंटकांनी वाहनांचं नुकसान केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय गांधी नगर येथे अज्ञात सात ते आठ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. 
 
हातात लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रे घेऊन दहशत पसरविण्याच्या उद्देशाने ही तोडफोड करण्यात आल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकीसह इतर वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.