गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (11:00 IST)

राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला कारण...

मिमिक्री, अश्लील शेरेबाजी, टीकाटिपण्णी आणि समाचार या गोष्टी राज ठाकरे यांच्या भाषणात नेहमीच असतात. पण गुढीपाडव्या निमित्त केलेल्या भाषणात मात्र राज ठाकरे यांनी अंतर्मुख होऊन 'लोक मला का ऐकायला येतात' असा सवाल सुद्धा केला.
 
'शेतकरी आत्महत्या करतोय,' हे वाक्य तिनदा बोलून दाखवताना काहीशा भरकटलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी 3 महत्त्वाच्या भूमिका घेतल्या. त्या बदलेल्याही आहेत आणि त्यांचं राजकारण पुढे घेऊन जाणाऱ्याही आहेत.
 
राज ठाकरे यांचं भाषण भरकटू नये किंवा त्यात राहिलेल्या मुद्द्यांचा समावेश व्हावा याचा प्रयत्न अनिल शिदोरे करताना दिसून आले. त्यांनी 2 वेळा एक एक कागद राज ठाकरे यांचं भाषण सुरू असताना त्यांच्याकडे आणून दिले.

थेट मुस्लिमविरोधी भूमिका, भाजपबाबत सॉफ्ट कॉर्नर आणि राष्ट्रवादीला थेट शिंगावर या तीन प्रमुख भूमिका राज ठाकरे यांच्या या भाषणात दिसून आल्या. त्या त्यांनी का घेतल्या, त्याच्यामागे काय कारण आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
 
थेट मुस्लिमविरोधी भूमिका
आतापर्यंत राज ठाकरे यांनी मुस्लिमांच्या विरोधात भूमिका घेतली नाही असं नाही. पण यंदा त्यांनी थेट मुस्लिमांच्या मशिदी, मदरसे आणि त्यांच्या वस्त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
 
"मशिदींवरचे भोंगे उतरवावेच लागलीत, नाही तर आज सांगतो मशिदींसमोर दुप्पट आवाजात स्पिकर लावा. त्यावर हनुमान चालिसा लावा," असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
 
त्याच्या या भाषणाची तुलना 90 च्या दशकातल्या बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांशी थेट करता येऊ शकते. बाळासाहेबही तेव्हा थेट मशिदींच्या भोग्यांच्या विरोधात भूमिका घ्यायचे. त्यावेळी मग मंदिरांमध्ये महाआरतींचं पेव फुटलं होतं.

बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातसुद्धा तेव्हा पाकिस्तानचा वारंवार उल्लेख यायचा. तसाच उल्लेख करत मुंबई आणि परिसरातल्या मुस्लिम वस्त्यांमध्ये थेट पाकिस्तानच्या पाठिंब्याने देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
 
अर्थात धर्म घरात ठेवा, असं मुस्लिमांना आवाहन करणाऱ्या राज यांनी हिंदूंना मात्र हिंदू म्हणून एकत्र येण्याचं आवाहन केलं.
 
निर्माण झालेली पोकळी भरून काढायची किंवा मिळालेल्या संधीचा वापर करायचा या राज ठाकरेंच्या आतापर्यंतच्या राजकारणाच्या स्टाईलला साजेशीच अशी ही भूमिका आहे असं म्हणता येईल.
 
सेक्युलर पक्षांच्या बरोबर गेलेल्या शिवसेनेमुळे निर्माण झालेली पोकळी आणि ठाकरी शैलीतून हिंदुत्व तसंच मुस्लीमविरोध मांडण्यासाठी असलेला वाव राज ठाकरे यांनी अचूक हेरूनच या भूमिका मांडल्याचं बोलता येऊ शकतं.
 
अर्थात थेट मशिदींच्या भोंग्यांच्याविरोधात भूमिका घेऊन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना अडचणीत टाकलं आहे. उद्या जेव्हा मनसेचे लोक अशा प्रकारे आंदोलन करू लागले आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊन ठाकरे सरकारनं कारवाई केली तर शिवसेनेला हिंदूविरोधी ठरवणं मनसेला सोपं जाणार आहे. हे बाळासाहेबांच्या भूमिकेच्या विरोधात आहे हे मनसे आणि भाजप सांगू शकतात.
 
राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे विश्लेषण करताना लोकशाही न्यूजचे संपादक आणि राजकीय विश्लेषक दीपक भातुसे सांगतात,
 
"महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीचे भोंगे असा राज ठाकरे यांचा हा प्रवास आहे. त्यांना लोक ऐकतात. पण त्याचं मतांमध्ये किती परिवर्तन होतं हे माहिती नाही. पण त्यांच्या भाषणाची दिशा पाहता महाराष्ट्रातली जास्तीत जास्त हिंदू मतं ही महाविकास आघाडीच्या विरोधात कशी राहतील याकडेच त्यांनी लक्ष्य केंद्रित केल्याचं दिसून येत आहे."
 
भाजप पूरक भूमिका घेतली कारण...
भाजपला बहुदा आता राज ठाकरे यांच्या तोंडभरून स्तुती आणि कठोर टीकेची सवय झालेली असावी.
 
उत्तर प्रदेशात विकास होतोय, ते थेट शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जाब विचारून राज ठाकरे यांनी भाजपची बाजू मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या भाषणात केला.
 
पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत त्यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली. पण देवेंद्र फडणवीस यांचा साधा उल्लेखसुद्धा त्यांनी केला नाही.

अर्थात याच राज ठाकरे यांनी 2019च्या लोकसभेला एकही उमेदवार उभा न करता राज्यभर प्रचारसभा घेऊन भाजप आणि मोदींच्याविरोधात रान उठवलं होतं. लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर 'अनाकलनीय' हा एकच शब्द ट्वीट करून थेट ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे सेक्युलरवाद्यांना हिरो वाटले होते.
 
पण तीन वर्षांतच राज ठाकरे यांची भूमिका आता परत भाजपच्या बाजूने झाली आहे जशी ती 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या काळात होती. त्याला कारण येत्या महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेच्या संभाव्य युतीचं असल्याच्या चर्चा आहेत.
 
त्याशिवाय राज ठाकरे हे आता भेट महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या द्वंद्वामध्ये उतरल्याचं यावरून स्पष्ट होतं असं दीपक भातुसे यांना वाटतं.
 
"राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा फायदा काही प्रमाणात भाजपला होऊ शकतो, पण मनसेला त्याचा किती फायदा होईल हे आता सांगता येणार नाही," असं भातुसे बीबीसीशी बोलताना सांगतात.
 
राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकेचं कारण...
खरंतर येत्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे शिवसेनेवर जोरदार टीका करतील अशी अपेक्षा होती.

पण 'उद्धव ठाकरेंनी कुटुंबाला सांगावं की मुंबई महापालिकेत जाऊन त्यांचे व्यवहार पाहू नका' आणि 'शिवसेनेला बाळासाहेबांच्या स्मारकारासाठी मुंबईत प्लॉट का नाही सापडला,' या दोन मुख्य टीका सोडल्या तर त्यांचा निशाण्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रामुख्यानं राहिली.
 
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं ते जेम्स लेन पुस्तकाचा वाद ते नवाब मलिकांवरील दाऊदच्या संबंधाचा आरोप अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आगपाखड केली.
 
त्यांनी थेट शरद पवारांचं नाव घेऊन त्यांच्यावर जातीचं राजकारण पसरवल्याचा आरोप केला.
 
आता सर्वांना प्रश्न पडला असेल की राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर थेट एवढी टीका का केली. सत्तेत शिवसेना आणि काँग्रेससुद्धा आहे. शिवसेनेवर त्यांनी ओझरती टीका केली तर काँग्रेसचा त्यांनी साधा उल्लेखसुद्धा केला नाही.
 
त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याचं प्रयोजन काही लक्षात येत नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत मर्यादित ताकद आहे.
 
अशा परिस्थितीत त्याचं उत्तर दडलं आहे ते वर उल्लेख केलेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये.
 
राज ठाकरे यांनी त्यावेळी मोदी-शहा आणि भाजपच्याविरोधात भूमिका घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर ईव्हीएमच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली.
 
विधानसभा निवडणुकांच्या काळातसुद्धा राज ठाकरेंनी भाजप-शिवसेनेच्या विरोधातच प्रचार केला. पण प्रत्यक्षात निकालांनंतर शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर गेली आणि मोठ्या परिश्रमाने राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठी तयार केलेली स्पेस संपुष्टात आली आणि त्याचीच सल राज ठाकरे यांच्या शनिवारच्या भाषणात दिसून आली.
 
अर्थात या सर्व पक्षांना एकत्र आणणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. शिवसेनेला जवळ करत राष्ट्रवादीनं फसवणूक केल्याची भावना राज ठाकरेंच्या मनात असावी आणि तीच या टीकेतून समोर येताना दिसली.