शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (12:14 IST)

राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन: 100 सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांना अनोखी मानवंदना

राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात आज (शुक्रवार, 6 मे) अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.
 
या उपक्रमाअंतर्गत सकाळी 10 वाजता राज्यातील सर्व नागरिकांनी 100 सेकंद स्तब्ध राहावं, असं आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. त्यानुसार नागरिकांनी आहे त्याठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून या उपक्रमात सहभाग नोंदवला.
 
या निमित्ताने शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले आहे.
 
राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापुरात झाला होता. तर त्यांचं निधन वयाच्या 47व्या वर्षी 6 मे 1922 रोजी मुंबईत झालं होतं.
 
शाहू महाराजांच्या निधनाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूरसह राज्यभरातील नागरिकांनी 100 सेकंदासाठी स्तब्ध राहून त्यांना मानवंदना द्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं होतं.
 
ही स्तब्धता म्हणजे, राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या 100 व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे. सर्व व्यवहार 100 सेकंद थांबून लोकांनी ते असतील त्या ठिकाणी हे स्तब्धता रुपी वंदन द्यावं असा हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
 
शाहू महाराजांनी समाजातील दीनदुबळे आणि वंचितांसाठी जे प्रचंड मोठं कार्य केलं, त्याचं यावेळी स्मरण केलं जाणार आहे. शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलं.