सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (21:20 IST)

रावसाहेब दानवे हे फक्त स्वप्न पहात, अन्… खडसेंचा टोला

जळगाव केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. दानवेंच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते एकनाथराव खडसे  यांनी टोला लगावला आहे. भाजपचे  अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवत असतात. आता रावसाहेब दानवे यांनीही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. मात्र, दानवे हे फक्त स्वप्न पाहतात आणि मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असा चिमटा खडसे यांनी काढला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.
 
काय म्हणाले होते दानवे?
 
राज्याच्या राजकारणात रोज नवी घडामोड घडताना दिसत आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहेत. तर सत्ताधारी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून  सरकार खंबीर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं आश्वस्त करण्यात येत आहे. अशात महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. “महाविकास आघाडीतील 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील”, असं धक्कादायक विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
 
दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना एकनाथ खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात. चंद्रकांत दादांनी, तर अनेक तारखा दिल्या. मात्र, त्या तारखा मागे गेल्या म्हणत त्यांनी पाटलांवर टीका केली. आता पाटील यावर काही बोलतात का, हे पाहावे लागेल.