सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2022 (15:14 IST)

आम्हाला बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्यावी अशी मागणी राऊतांनी केली

sanjay raut
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रातील काही गावांवरचं दावा केला आहे. तसेच महाराष्ट्रात कन्नड भवन उभारण्याची घोषणा केली आहे. यावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जर इर्षेने कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमाभागातील लढा देत असतील आणि काही गावांवर ते हक्क सांगत सोलापूर किंवा कोल्हापूरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर महाराष्ट्रालाही बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्यावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावर भूमिका स्पष्ट केली.
 
राऊत म्हणाले की, हा देश फेड्रल स्टेट आहे, अनेक राज्यांचे मिळून एक देश बनला आहे, ही संस्थान नाही, राज्य आहे. प्रत्येक राज्याचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध आहेत, तसेच कर्नाटकसोबतही आहेत. मुंबईत अनेक राज्यांचे भवन आहे. राज्याचे मुख्यमंत्री काल नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले, हे नवीनचं मी ऐकलं. तिथून आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात आसाम भवन उभारण्याची घोषणा केली, आनंद आहे. एकमेकांच्या राज्यात जात राहिलं पाहिजे, यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता घट्ट होते. दिल्लीत जसं प्रत्येक राज्याचं भवन आहे. तस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असेल की, कोल्हापूर, सोलापूरमध्ये कर्नाटकच्या संस्था उभ्या कराव्यात. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, मुंबईतही आम्ही कानडी बांधवांना अशाप्रकारची भवनं उभी करु दिली आहेत. अनेक कर्नाटक हॉल, भवन त्यांच्या नावे आहेत. कानडी बांधवांशी वाद असण्याचे कारण नाही पण ते इर्षेने सीमाभागातील लढा, काही गावांवर ते हक्क सांगतायत म्हणून सोलापूर किंवा कोल्हापूरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्यावी अशी मागणी राऊतांनी केली आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor