1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (21:11 IST)

संजय राऊत हे मातोश्रीला सुरुंग लावणारा विषारी प्राणी : नारायण राणे

narayan rane
माझा इतिहास शिवसेना घडविण्यामध्ये आहे. शिवसेना संपविण्यामध्ये नाही, असे स्पष्ट करत संजय राऊत हे शिवसेना वाढविणारे नाहीत तर संपवणारे आहेत. संजय राऊत हे मातोश्रीला सुरुंग लावणारा विषारी प्राणी आहे अशी जळजळीत टीका भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे केली.
 
माझ्या वाटेला येऊ नका. माझी सुरक्षा सोडून मी तुम्ही सांगाल तेथे यायला तयार आहे, असे आव्हान राणे यांनी राऊत यांना दिले. एवढेच नव्हे तर संजय राऊत हे राज्यसभेत असताना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलायचे ते शिवसेना पक्षप्रमुखांना भेटून सांगणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
गेल्या दोन दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. राणे यांनी ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखावरून संजय राऊत यांच्यावर टीका करताना आपण त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. तर हिंमत असेल तर पोलीस संरक्षण सोडून समोरासमोर येण्याचे आव्हान राऊत यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे आमदार राम कदम हे  लोकांना काशीला घेऊन जात आहेत. ते पवित्र काम करीत आहेत. आता रामाचे कार्य असताना येथे रावणाचे काय काम आहे, असा टोला लगावत त्यांनी राऊत यांच्यावर संताप व्यक्त केला.

Edited By- Ratnadeep Ranshoor