सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (16:25 IST)

पूल वाहून गेल्याने साताऱ्यातून मेढामार्गे महाबळेश्वरला जाणारा रस्ता बंद

महाबळेश्वरसह साताऱ्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे महाबळेश्वर आणि साताऱ्याला जोडणाऱ्या रस्त्याचा काही भाग वाहून गेलाय. जावळी तालुक्यातील मांमुर्डी गावानजीकचा सातारा महाबळेश्वरला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने साताऱ्यातून मेढामार्गे महाबळेश्वरला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
 
महाबळेश्वर, पाचगणी, वाईसह सातारा परिसरात बुधवार दुपारपासून सुरु झालेला पाऊस रात्रभर जोरदार सुरु होता. या मार्गावर रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूला पाणी मोठ्या प्रमाणात वाढत गेले आणि पाण्याचा मोठा डोह तयार झाला.
 
बुधवारी दुपारी पडलेल्या पावसाने ओढ्या नाल्यांना पाणी आले. काही ठिकाणी रस्त्यासाठी टाकण्यात आलेला भरावही खचून वाहून गेला. त्यातच घाट रस्त्यावरही पाण्याचा दबाव वाढल्याने रस्त्याचा काही भाग वाहून गेला. मामुर्डी गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या कामाच्या इथं पाणी मोठया प्रमाणात साचले होते त्यातच पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने भराव वाहून गेला. रस्ता वाहून गेल्याने सातारा केळघर महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद झाला. त्यामुळे केळघरला जाणाऱ्यांना मेढामार्गे पर्यायी रस्ता म्हणून मोहाट- म्हाते- सावली मार्गेने जाण्याचे निर्देश देण्यात आलेत. सर्व वाहतुक या मार्गाने वळण्यात आली आहे.