जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ संभाजीराव काकडे यांचे निधन
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ संभाजीराव काकडे (89) यांचे निधन झाले. बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून काकडेंची ओळख होती. लाला या नावाने ते समर्थकांमध्ये ओळखले जात. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. जनता पक्षाची प्रदीर्घ काळ धुरा सांभाळणारे आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना घडवणारे म्हणून संभाजीरावांची ओळख होती.
1971 मधील विधान परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा संभाजीराव काकडे आमदार झाले. ते परिषदेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रंगराव पाटील यांचा पराभव केला होता.
संभाजीराव काकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1978 मध्ये भारतीय लोक दलातर्फे, तर 1982 मध्ये जनता दलातर्फे ते बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते.
सुरुवातीला सिंडीकेट काँग्रेस, नंतर जनता पक्ष तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना आणि तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते. बारामती तालुक्यातील काकडे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर घराणे मानले जाते.