रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (15:20 IST)

शिंदे गटात जाणाऱ्या संभाव्य खासदारांच्या घर, कार्यालयाला सुरक्षा कवच

nashik police
शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य खासदारांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या संभाव्य खासदारांना सुरक्षा पुरवण्यात येत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
शिवसेनेचे खासदारही बंड करण्याची शक्यता आहे. हे खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. या शक्यतेनंतर महाराष्ट्रात शिवसेना खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
नागपुरात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर बंदोबस्त लावल्याच्या माहितीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुजोरा दिला आहे.
 
राहुल शेवाळे, भावना गवळी,  कृपाल तुमने,  हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, धर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीरंग बारणे हे खासदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या दाट शक्यता आहेत.
 
लोकसभेत “आम्हीच शिवसेना” असा दावा करणार आहेत. यात राहुल शेवाळे गटनेते आणि भावना गवळी यांची प्रतोदपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आठवडाभरापूर्वी नंदनवन इथे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली होती. संजय मंडलिक अजूनही तळ्यातमळ्यात असल्याची माहिती आहे.