शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:15 IST)

पालघरमध्ये सात वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा व्हायरस

zika virus
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात 7 वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये भारतातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता.

ही मुलगी झाईच्या आश्रमशाळेतील रहिवासी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून संसर्ग पसरू नये यासाठी उपाययोजनाही करण्यात येत आहे.
 
व्हायरसची लक्षणे काय?
झिका व्हायरसची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात जसे ताप, पुरळ, सांधे आणि स्नायू दुखणे, उलट्या होणे आणि डोकेदुखी. त्याची लक्षणे मलेरियासारखीच आहे असे देखील म्हणता येऊ शकतं. याचा संसर्ग धोकादायक आहे. रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. गरोदर मातेला या विषाणूची लागण झाल्यास मुलामध्ये मेंदूचे दोष निर्माण होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
झिका विषाणू माकडांमध्ये प्रथमच आढळून आला
पहिल्यांदा झिका व्हायरस माकडांमध्ये आढळलेे होते. डब्ल्यूएचओप्रमाणे 1947 मध्ये युगांडामध्ये एका माकडात हा विषाणू आढळला होता. नंतर माणसांनाही या विषाणूची लागण होऊ लागली. याची लक्षणे काही वेळा साधी असतात, परंतु गर्भवती महिलेच्या मुलावर त्याचा वाईट परिणाम होतो.
 
सेंटर फॉर डिसीज कंट्रोलप्रमाणे जर एखाद्याला एकदा संसर्ग झाला तर त्याच्याशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित होते आणि भविष्यात ती व्यक्ती या संसर्गापासून सुरक्षित राहते. त्याची लक्षणे फ्लू सारखीच असतात. झिका वर अद्याप कोणताही इलाज नाही.