गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (15:23 IST)

शरद पवार-अजित पवार : महाराष्ट्रातील काका-पुतण्यांच्या 'या' 7 जोड्यांमध्ये पडलेली ठिणगी

sharad pawar ajit pawar
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (2 जुलै) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
या शपथविधीनंतर अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या बरोबरीने बोलताना आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्हीच राष्ट्रवादी पक्ष आहोत असं सांगितलं.
 
दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी बंड करणाऱ्या नेत्यांवर आणि शपथविधीला उपस्थित असलेल्या नेत्यांवर कारवाई केली आहे.
 
तसंच, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षीय शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
 
मात्र, अजित पवार गटानं या सर्व कारवाया फेटाळून स्वत: नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
 
एका अर्थाने अजित पवार यांनी काका शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा सांगितला आहे.
 
अजित पवारांचं हे बंड राजकीय असलं तरी त्याकडे काका-पुतणे वाद या अंगानंही पाहिलं जातंय.
 
महाराष्ट्राला काका-पुतण्या वाद नवीन नाहीत. ठाकरे, पवार, मुंडे, तटकरे इत्यादी अनेक कुटुंबांमध्ये काका-पुतण्या वाद झाला आहे.
 
यातील अनेक वादांची कारणं राजकीय असली, तरी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरलीत. बीबीसी मराठीनं यातल्या निवडक संघर्षांचा आढावा घेतला आहे.
 
1. शरद पवार आणि अजित पवार
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा मुद्दा राहिला आहे.
 
याबाबत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "2004 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद दिसू लागले."
 
"या निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे यायला हवं होतं. परंतु, शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेसबरोबर बोलणी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं आणि त्याबदल्यात दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद जास्तीचं घेतलं," देशपांडे सांगतात.
 
अजित पवार त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, ते मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरतायत, अशा त्यावेळी बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.
 
"शरद पवार आणि अजित पवार यांच्या दृष्टिकोनातील आणि राजकारणातल्या तारतम्याचा जो फरक आहे, तो साधारण तेव्हापासून महाराष्ट्राला कळायला सुरूवात झाली. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत सुद्धा तिकीट वाटपावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सौम्य स्वरूपाचे मतभेद झाले होते," असं पद्मभूषण देशपांडे सांगतात.
 
2012 साली अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला होता.
 
अजित पवार आणि शरद पवार यांच्या स्वभावात मोठा फरक आहे. हा स्वभावच मतभेदाचं कारण आहे, असं देशपांडे सांगतात.
 
पद्मभूषण देशपांडे पुढे म्हणतात, "महाराष्ट्राची समज, महाराष्ट्राच्या प्रश्नांची समज, राजकारण करताना टाकावे लागणारे डावपेच, मतदारसंघांची माहिती, कार्यकर्त्यांची माहिती इत्यादी गोष्टी शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील जमेच्या बाजू आहेत. मात्र, अजित पवार हे तापट आहेत, बोलतानाही कठोर बोलतात. शरद पवार तसे बोलत नाहीत. हा स्वभावातील फरक मतभेदाला कारणीभूत आहे."
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांना मावळमधून रिंगणात उतरवलं होतं.
 
देशपांडे सांगतात, "शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीला विरोध केला होता. यावेळचा मतभेदाचा मुद्दा ताणला गेला आणि उघड मतभेद झाला. 'एका घरातील किती जणांनी उमेदवारी करायची' इथपासून ते 'मी उमेदवारी करणार नाही' इथवर ते सगळं आलं होतं."
 
पुढे पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढलेच. त्यात ते पराभूत झाले.
 
यावेळीही अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद प्रकर्षानं दिसून आल्याचे पद्मभूषण देशपांडे सांगतात.
 
आमच्या घरात कसलेही वाद नाहीत असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आमच्या घरात कुटुंबप्रमुखाचा शब्द अंतिम मानला जातो आणि आमचे कुटुंबप्रमुख शरद पवार हे आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.
 
2. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते होते. 1966 साली त्यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रभर पक्ष वाढवत नेला. कालांतरानं ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे हे राजकारणात आले आणि शिवसेनेत सक्रिय झाले.
 
राज ठाकरे हे बाळासाहेबांचे बंधू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे सुपुत्र.
 
बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता.
 
काकांसारखं व्यक्तिमत्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले. शिवसेनेची नाशिक जिल्ह्यातली सूत्रं राज यांच्याकडे आली.
 
30 जानेवारी 2003 हा दिवस राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या दिवशी महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं. याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यामुळे उद्धव हेच बाळ ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं.
 
राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का होता. पण गंमत म्हणजे उद्धव ठाकरेंचं राज यांनीच पुढे केलं होतं. अर्थात, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता असं राज यांनी पुढे सांगितलं.
27 नोव्हेंबर 2005 रोजी राज यांनी शिवसेना सोडली. त्यापूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनीही सेना सोडलेली होतीच. मात्र, राज यांच्या जाण्यानं शिवसेनेतून पहिल्यांदा एक 'ठाकरे' बाहेर पडले. महाराष्ट्रातल्या 'काका-पुतण्या' वादाची मोठी घटना म्हणून याकडे पाहिली जाते.
 
राज ठाकरे यांनी पुढे स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल सुरू केली. त्याचंच पहिलं पाऊल म्हणून त्यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.
 
राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर आपण कुटुंब म्हणून राज यांच्या पाठीशी आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे हे आपल्यात राजकीय वाद नाहीत तर मतभेद आहेत असं सांगतात.
 
उद्धव ठाकरे यांचं ऑपरेशन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना रुग्णालयातून स्वतः ड्राइव्ह करून घरी आणल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे.
 
तसेच राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर आपण कुटुंब म्हणून राज यांच्या पाठीशी आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
 
3. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे
बीडमधील मुंडे काका-पुतण्या वादानं महाराष्ट्रात मोठी चर्चा घडवून आणली. आजही बीडमधील स्थानिक निवडणुका या गोष्टीच्या भोवताली होताना दिसतात.
 
देशाचे माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून त्यांचे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.
2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.
 
जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.
या काका-पुतण्यांमध्ये एवढा वाद झाला की, 2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला.
 
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजा यांनी बाजी मारली. यंदाही म्हणजे 2019 च्या निवडणुकीतही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच परळीतून सामाना रंगणार आहे. त्यामुळे काका-पुतण्या वाद आता भाऊ-बहिणींपर्यंत येऊन ठेपला आहे.
 
गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांची धारणा अजूनही धनंजय यांनी गोपीनाथ मुंडेंना फसवल्याचीच धारणा आहे, असं वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी सांगतात.
 
4. उदयनराजे भोसले आणि अभयसिंहराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वंशज म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या साताऱ्यातील भोसले राजघराणंही काका-पुतण्याच्या वादाला मुकलं नाही. अभयसिंहराजे भोसले आणि त्यांचे पुतणे उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.
 
उदयनराजे भोसले यांचे काका अभयसिंह राजे भोसले काँग्रेसमध्ये होते. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी संस्थात्मक, रचनात्मक कामाला सुरुवात केली. सहकार चळवळीच्या माध्यमातून संघटना उभी केली. कारखाना, दोन बँका उभ्या केल्या. अशापद्धतीनं हळूहळू त्यांनी राजकारणात पाय रोवायला सुरुवात केली होती.
याबाबत 2015 च्या 'कालनिर्णय'च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी लिहिलं होतं, "अभयसिंह राजे यांचा हा उत्कर्ष कल्पनाराजे भोसले यांना खुपत होता. राजकारणातली सगळी जागा अभयसिंहांनी व्यापली तर आपल्या मुलाचं, उदयनराजेंचं काय, ही चिंता त्यांना सतावत होती. त्याच ईर्ष्येतून त्यांनी 1989 मध्ये निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली. त्यानिमित्तानं महाराष्ट्रात हातपाय पसरू पाहणाऱ्या शिवसेनेला साताऱ्यातून राजघराण्यातील व्यक्ती उमेदवार म्हणून मिळाली."
 
कल्पनाराजे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून साताऱ्यातून अभयसिंहराजे यांच्याविरोधात उभ्या राहिल्या. परंतु अभयसिंह यांच्या संघटनापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
 
त्यानंतर 1991मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. याच निवडणुकीत उदयनराजेंनी काका अभयसिंह राजेंच्या विरोधात स्वत:चं पॅनेल उभं केलं. स्वत: दोन वॉर्डातून उभे राहिलेले उदयनराजे एका वॉर्डातून निवडून आले आणि एकात त्यांचा पराभव झाला.
 
1996 मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली.
 
"या निवडणुकीत उदयनराजे उमेदवार असतानाही अभयसिंहराजे यांनी पक्षशिस्त म्हणून काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले यांचा प्रचार केला. त्यामुळे अभयसिंह राजे आणि उदयनराजे यांच्यात फूट पडली," चोरमारे लिहितात.
 
1998 ला लोकसभेची निवडणूक झाली. त्यात अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार असतानाही लोकसभेला उभे राहिले आणि निवडून आले. यामुळे मग सातारा विधानसभेची जागा मोकळी झाली आणि तिथं पोटनिवडणूक घ्यावी लागली.
अभयसिंह राजे लोकसभेत गेल्यानंतर सातारा विधानसभेची जागा आपल्याला मिळेल, अशी उदयनराजेंची अपेक्षा होती. परंतु अभयसिंहराजेंनी लोकसभेची उमेदवारी स्वीकारतानाच पुत्र शिवेंद्रराजे यांच्या उमेदवारीची हमी घेतली होती. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी शिवेंद्रराजे यांना मिळाली.
 
"याच काळात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष होतं. त्यांनी उदयनराजेंना हेरलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचं मन वळवलं. ते भाजपचे उमेदवार झाले. अभयसिंहराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या रूपानं एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी, असं सत्तेचं केंद्रीकरण दिसू लागलं. त्यातून उदयनराजेंच्या बाजूनं सहानुभूती निर्माण झाली आणि त्यांनी निवडणूक जिंकली," चोरमारे लिहितात.
 
1999 ला विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी उदयनराजे यांच्यासमोर खुद्द अभयसिंहराजे यांचं आव्हान होतं. मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजेंविरुद्ध फिर्याद देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना अटक झाली. ते 22 महिने तुरुंगात होते. नंतर उदयनराजेंची यातून निर्दोष मुक्तता झाली.
 
"या खून खटल्यात अभयसिंहराजे यांनी आपल्याला गोवलं आणि आपली राजकीय कारकीर्द संपवली, असा आरोप उदयनराजेंनी केला. या प्रकरणानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद वाढीस लागला," असं 'पुण्य नगरी'च्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक विनोद कुलकर्णी सांगतात.
 
2006 ला सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली आणि निकाल त्रिशंकू लागला. 19 जागा उदयनराजेंच्या आघाडीला, 18 जागा शिवेंद्रराजेंच्या आघाडीला तर 2 जागा विरोधकांना मिळाल्या.
 
साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके सांगतात, "2006 साली शिवाजीराजे भोसले यांनी घराण्यातल्या एकीसाठी पुढाकार घेतला. पुढाकार घेऊन सगळं घराणं एक करायचं ठरवलं. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन घडवून आणलं. पुढे 10 वर्षं हे मनोमीलन राहिलं. पण 2016 च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा फिस्कटलं."
 
अभयसिंहराजे विरूद्ध उदयनराजे हा काका पुतण्याचा वाद आता उदयनराजे विरूद्ध शिवेंद्रराजे या चुलत भावांपर्यंत येऊन ठेपला आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे हे दोघेही भाऊ आता भाजपमध्ये सामिल झाले आहेत.
 
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघेही भाजपमध्ये गेले असले, तरी त्यांच्यातील वाद संपला असं म्हणता येणार नाही, असं विजय मांडके म्हणतात.
 
5. सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरातही 'काका-पुतणे' वाद झाला आहे. श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर या तटकरे काका-पुतण्या वादावर शिक्कामोर्तबच झाला, असं वरिष्ठ पत्रकार मिलिंद अष्टिवकर सांगतात.
 
सुनील तटकरे यांच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे राजकारणात आले. अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरेही राजकारणात आले आणि राष्ट्रवादीकडून ते श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदारही झाले.
 
सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे विधान परिषदेत आणि मुलगी आदिती तटकरे या सध्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदारआहेत.
अनिल तटकरे यांचे दुसरे पुत्र संदीप तटकरे यांनी 2016 साली रोहा नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पर्यायानं सुनील तटकरेंनाच आव्हान दिलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार असूनही अवधूत तटकरे यांनी लहान भावाचा म्हणजे शिवसेना उमेदावर संदीप तटकरेंच्या प्रचाराचा नारळ फोडला होता.
 
तटकरे काका-पुतण्या वादाची इथूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
 
मात्र, रायगडमधील वरिष्ठ पत्रकार मिलिंद अष्टिवकर म्हणतात, "तटकरे कुटुंबातील वाद म्हणजे ठरवून केलेल्या उत्कृष्ट राजकारणाचा नमुना असल्याचे अनेकदा समोर आले आहे."
 
मिलिंद अष्टिवकर सांगतात, "रोहा नगर परिषदेच्या 2016 मधील निवडणुकीत विरोधातील मतांची विभागणी होणे तटकरेंसाठी आवश्यक होते. तेव्हाही तटकरे कुटुंबात असेच वाद झाले. सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेशासाठी शिवसेनापुरस्कृत उमेदवारी केली. तर आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला होता. या निवडणुकीत मतविभागणीचा फटका बसून नगराध्यक्षपदासाठी विरोधात असलेले अपक्ष उमेदवार समीर शेडगे यांचा केवळ 6 मतांनी पराभव झाला होता."
 
मात्र, काका-पुतण्या वादाची चर्चा झालेल्या या निवडणुकीनंतर संदीप तटकरे पुन्हा स्वगृही परतले तर डिसेंबर 2016 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करणारे आमदार अवधूत तटकरे एप्रिल 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या अदिती तटकरे यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वांत पुढे होते.
 
"कौटुंबिक वाद असल्याचे मतदारांना तटकरे परिस्थितीनुरूप भासवत असतात आणि निवडणुकीत गरजेप्रमाणे हे वाद जसे पुन्हा होतात, तसेच ते अपसूक मिटत असल्याचे अनेकदा समोर आले आहे." असंही मिलिंद अष्टिवकर म्हणतात.
 
6. जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर
काही वर्षांपूर्वी राज्याचे विद्यमान मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. ते बीडमधून आमदार होते. दुसरीकडे, 2019 च्या निवडणुकीसाठी संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे बीडमधून आमदार आहेत. 2019 मध्ये बीडमधून थेट क्षीरसागर काका-पुतणे असा सामना रंगला होता.
 
क्षीरसागर काका-पुतण्या वादाचं मूळ सत्तेतील वाटपात आढळून येतात, असं वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी सांगतात.
 
बीडमधील राजकारण जसं मुंडे घराण्याभोवती फिरतं, तसेच ते क्षीरसागर घराण्याभोवतीही फिरतं.
 
केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या. जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं राजकारणात आहेत. आईसह तिघाही भावांची कारकीर्द आधी काँग्रेस आणि नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले.
मात्र राष्ट्रवादीत असतानाच या तिन्ही भावांमध्ये विसंवाद सुरू झाला आणि त्याला कारण ठरलं सत्तेतील वाटा.
 
सुशील कुलकर्णी सांगतात, "तिघेही भाऊ राजकारणत असले तरी सत्तेमध्ये भारतभूषण यांना मोठा वाटा मिळाला. ते किंवा त्यांची पत्नी असे दोघेच पदावर असायचे. म्हणून त्यांना 'अध्यक्षसाहेब' असं म्हटलं जातं. जयदत्त क्षीरसागर हे भारतभूषण यांच्यासोबतच होते. संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांना सत्तेचा वाटा तुलनेनं कमी मिळाला."
 
तरीही क्षीरसागर घरात तसं उघड बंड झालं नव्हतं. पुढे संदीप क्षीरसागर पंचायत समितीचे सभापती झाले, जिल्हा परिषदेत सभापती झाले.
 
मात्र कुलकर्णी सांगतात, "पुढे जेव्हा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देण्याची वेळ आली, त्यावेळी ते संदीप क्षीरसागर यांना द्यायचं की आणखी कुणाला, हा वादाचा मुद्दा झाला. जवळपास संदीप क्षीरसागर यांच्याकडे अध्यक्षपद येणार याची खात्री असताना विजयसिंह पंडितांना दिलं गेलं. इथेच खरी काका-पुतण्यात संघर्षाची ठिणगी पडली."
आपले वडील सर्व कामं करतात, मात्र सत्तेचा वाटा मिळत नाही, हे संदीप क्षीरसागर यांना वाटलं आणि तिथून मग संदीप यांनी आपलं वेगळं बस्तान बांधण्यास सुरुवात केली.
 
या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहूनच अंतर्गत धुसफूस सुरू होती.
 
आता जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर हे शिवसेनेत, तर रवींद्र क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीत आहेत.
 
7. अशोक पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर
राज्याचे एकेकाळचे मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या कुटुंबातही अलीकडे काका-पुतण्या वाद पाहायला मिळाला आहे.
 
दैनिक सामनाचे लातूर जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर सांगतात, "2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अशोक पाटील निलंगेकरांना उमेदवारी दिली होती. स्थानिक राजकारणावर अशोक पाटील निलंगेकर यांची चांगली पकड होती. ते अनेक वर्षं जिल्हा परिषदेचे सदस्य होते, अध्यक्षही होते. भाजपने अशोक पाटील यांचे पुतणे संभाजी पाटील निलंगेकर यांना निलंगा मतदारसंघाची उमेदवारी दिली. पुतण्याने काकांचा 21 हजार मतांनी पराभव केला होता."
 
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर आणि त्यांचे नातू संभाजी निलंगेकर यांच्यात थेट दोन वेळा लढत झाली होती. त्यात एक वेळा संभाजी पाटील जिंकले होते. तसेच संभाजी यांच्या आई रूपाताई निलंगेकर या भाजपच्या तिकिटावर 2004 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
 
2014 मध्ये आपल्या वडिलांच्या जागेवर अशोक पाटील निलंगेकर उभे राहिले. त्यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संभाजी पाटील निलंगेकर उभे राहिले आणि ते निवडून येऊन लातूरचे पालकमंत्री बनले होते.
 



Published By- Priya Dixit