गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 एप्रिल 2023 (21:55 IST)

शरद पवार एकही वज्रमूठ सभेला हजर राहणार नाहीत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

sharad pawar
मुंबई :  मोठी बातमी समोर येत आहे. एक मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणार नसल्याचं समोर आलं आहे. शरद पवार मुंबईच्या वज्रमूठ सभेला जाणार नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. पवार सभेला का जाणार नाहीत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र राज्यातील नेते सभेला जात असल्यानं शरद पवार वज्रमूठ सभेला जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याची चाहूल लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी 2024च्या निवडणुका एकत्र लढेल हे आताच कसं सांगू? असं म्हणाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याचा वेगळा किंवा चुकीचा अर्थ काढू नका, असंही स्पष्टीकरण दिलं आहे.
 
 
राज्यात आणि देशात आगामी निवडणुकांमध्ये भाजपला घेरायचं असेल किंवा भाजपचा पराभव करायचं असेल तर सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येणं जरुरीचं असल्याचं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे. याच विचारातून देशभरातील विरोधत एकवटत आहेत. महाराष्ट्रात तर 2019 च्या निवडणुकीनंतरच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची स्थापना झाली. या महाविकास आघाडीचं राज्यात अडीच वर्षे सत्ताही राहिली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने हे सरकार कोसळलं.
 
आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीची राज्यभरात सभा घेण्यात येत आहे. यापैकी पहिली सभा ही संभाजीनगर येथे झाली. त्यानंतर दुसरी सभा नागपुरात झाली. आता तिसरी सभा ही येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे महाविकास आघाडीच्या आगामी मुंबईतील वज्रमूठ सभेत हजर राहणार नाहीत. विशेष म्हणजे फक्त मुंबईच नाही तर राज्यात होणाऱ्या मविआच्या इतर कोणत्याही वज्रमूठ सभेमध्ये शरद पवार हजर राहणार नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत तीनही पक्षांचे दोन-दोन नेते संबोधित करणार आहेत. वज्रमूठ सभा ही राज्यातील नेत्यांची सभा आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्याने ते या सभेत हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वज्रमूठ सभेला हजर राहणार नसल्याची बातमी समोर आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor