सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवले यांची शिवसेनेतील भेटीबद्दल प्रथम प्रतिक्रिया
केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेतील फुटीबद्दल प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राजकारणात पुन्हा नव्याने उभारी घेऊ शकतील, असे वाटत नाही.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याविषयी टिप्पणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील असे वाटते का, असा प्रश्न रामदास आठवले यांना विचारण्यात आला.
त्यावर आठवले म्हणाले, २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेत येणार आहेत. मोदी यांच्यासोबत आता एकनाथ शिंदे असणार आहेत. एनडीएचे ४०० पेक्षा अधिक खासदार हे निवडून येतील.
उद्धव ठाकरे नसले तरी शिंदे यांच्यारुपाने खरी शिवसेना ही पंतप्रधान मोदींसोबत असेल. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना नक्की न्याय मिळेल. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटालाच मिळेल, असेही आठवले यांनी सांगितले.