गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (12:14 IST)

SSC Exam Board : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या 9 प्रश्नांची उत्तरं

दिपाली जगताप
राज्य सरकारने दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आणि अकरावी प्रवेशाबाबत राज्यातील निकष काय असतील यासंदर्भात नुकताच एक शासन निर्णय जारी केला आहे.
 
दहावीच्या निकालासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत तर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसमोर तीन पर्याय असणार आहेत.
 
पण तरीही गेल्या वर्षभरापासून शाळांच्या स्तरावरही अनेक ठिकाणी परीक्षा आणि ऑनलाईन क्लास झालेले नाहीत. त्यामुळे दहावीचा शाळांतर्गत निकाल कसा लागणार असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.
 
शिवाय, अकरावी प्रवेशात सामाईक प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी नेमके काय निवडायचे असाही संभ्रम आहे.
 
तेव्हा दहावीच्या सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि उच्चस्तरीय शिक्षणाधिकारी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिलेल्या प्रश्नांची काही उत्तरं आपण पाहूया,
 
1. दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं होणार?
प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्याचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार आहे. पण यावर्षी इयत्ता दहावीसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
 
विद्यार्थ्यांचं 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी परीक्षा मूल्यमापन - 30 गुण
विद्यार्थ्यांचे 10 वीचे गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन - 20 गुण असे लेखी आणि तोंडी परीक्षा मिळून 50 गुणांचं मूल्यमापन
उर्वरित 50 गुणांसाठी इयत्ता 9 वीमध्ये शाळांअतर्गत घेतलेल्या परीक्षांमधील विषयनिहाय गुणांचे अग्रीगेट गुण दिले जाणार.
2. विद्यार्थ्यांची नववीची परीक्षा झाली नसल्यास काय करणार?
गेल्यावर्षीही देशासह राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शाळा बंद होत्या. लॉकडॉऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे अनेक शाळांनी नववीच्या अंतिम परीक्षा घेतलेल्या नाहीत.
 
तर अनेक शाळांनी यंदाही दहावीच्या काही परीक्षा घेतलेल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करणार? असा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
 
यासंदर्भात शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या निकालाचं नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकारी करतील.
 
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "यासंदर्भात शाळांमध्ये समिती स्थापन करण्यात येईल. नववीची अंतिम परीक्षा झाली नसली तरी वर्षभरात झालेल्या परीक्षा आणि त्यात मिळालेल्या गुणांचा विचार केला जाईल."
 
दहावीच्या संदर्भातही शिक्षकांची समिती अंतिम निर्णय घेणार आहे. यात कोणत्याही शाळेने फेरफार केला तर दंडात्मक करावाई करण्याची तरतूद शासन निर्णयात करण्यात आल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
 
3. शालांतर्गत मूल्यमापनाच्या निकालाने विद्यार्थी समाधानी नसेल तर?
शाळेने विद्यार्थ्याला दिलेल्या गुणांच्याबाबतीत विद्यार्थी समाधानी नसल्यास किंवा विद्यार्थ्याला आणखी चांगले गुण मिळवायचे असल्यास राज्य सरकारने दोन पर्याय दिले आहेत.
 
पहिला पर्याय म्हणजे संबंधित विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी केवळ शाळांच्या निकालावर अवलंबून न राहता अकरावीसाठीची स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा देऊ शकतो. ही परीक्षा पूर्णत: ऐच्छिक असणार आहे. ही परीक्षा केवळ अकरावी प्रवेशासाठी असेल या परीक्षेच्या निकालावर दहावीचे गुण बदलता येणार नाहीत.
 
दुसरा पर्याय म्हणजे कोरोना आरोग्य संकटाची सद्यस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे एसएससी बोर्ड विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी देणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी आपले गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
 
पण ही परीक्षा पूर्णत: कोरोनाची रुग्णसंख्या, मृत्यूदर, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि इतर समस्यांवर अवलंबून आहे. शिवाय, ही परीक्षा होईपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवली जाणार नाही, असंह शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
4. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार?
शाळांअतर्गत गुणांच्या आधारे दहावीचा निकाल साधारण जून अखेरपर्यंत जाहीर करणार असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं आहे.
 
शाळांनी विद्यार्थ्यांना गुण देत असताना फेरफार केल्यास शिस्तभंग किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
यासाठी शिक्षण विभागातील एक तज्ज्ञांची समिती शाळांची भेट घेत राहणार आहे. ही भेट अनिश्चित असून यादरम्यान काही गैरकारभार आढळल्यास कारवाई केली जाईल, असं बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
5. अकरावीचे प्रवेश कसे होणार?
अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने विद्यार्थ्यांना चार पर्याय दिले आहेत.
 
पहिला पर्याय- दहावीच्या शाळाअंतर्गत निकालाच्या आधारावर अकरावीत प्रवेश घेता येणार आहे.
 
दुसरा पर्याय- अकरावीसाठी स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार. ही परीक्षा बहुपर्यायी म्हणजे OMR पद्धतीने घेतली जाईल. एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा आधारित असेल. दोन तासांची परीक्षा होणार. महत्त्वाचे म्हणजे ही सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाच्या आधारावर अकरावीत प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल.
 
यासंदर्भात बोलताना वर्षा गायकवाड यांनी सांगितलं, "अकरावी प्रवेशाचा पहिला टप्पा हा सामाईक परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल. म्हणजेच अकरावीच्या सामाईक परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश होतील. यानंतर उर्वरित जागांचे प्रवेश दहावीच्या निकालाच्या आधारे होतील."
 
तिसरा आणि चौथा पर्याय- ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या प्रचलित नियमांनुसार परीक्षा द्यायची आहे त्यांना बोर्डाकडून परीक्षेच्या दोन संधी देण्यात येणार आहेत. कोव्हिडची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच या परीक्षा होऊ शकतील असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या परीक्षांसाठी नेमका किती कालावधी लागेल हे आताच सांगता येणार नाही.
6. अकरावीची सीईटी म्हणजेच सामाईक प्रवेश परीक्षा कधी होणार?
अकरावीची सामाईक परीक्षा सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी अशा सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशात प्राधान्य दिलं जाणार आहे. दहावीचा निकाल साधारण जून अखेरपर्यंत जाहीर होणार आहे. त्यामुळे सामाईक परीक्षा जूननंतरच होण्याची शक्यता आहे. याबाबत कोणतीही तारीख ठरली नसल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं.
 
शाळांच्या निकालानंतर सामाईक परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा द्यायची आहे की नाही याची निवड करता येणं सोपं जाईल, असं दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
7. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश कसे मिळणार?
सीबीएसई दहावी बोर्डाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करू असं सांगितलं आहे. त्यामुळे सीबीएसई विद्यार्थ्यांचा निकालही शाळास्तरावर झालेल्या परीक्षांच्या निकालाच्या आधारे दिला जाणार आहे. पण अकरावीत प्रवेश घेत असताना मात्र सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र सामाईक परीक्षेचा पर्याय देण्यात आला आहे.
 
राज्यातील अकरावीसाठी होणारी सामाईक प्रवेश परीक्षा ही सीबीएसई विद्यार्थ्यांसाठीही खुली असणार आहे. ही परीक्षा दिल्यास सीबीएसई विद्यार्थ्यांनाही नियमाप्रमाणे अकरावी प्रवेशात प्राधान्य दिलं जाईल. म्हणजेच या परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या सर्व बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश पहिल्या टप्प्यात होतील.
 
सीबीएसईचे जे विद्यार्थी केवळ अंतर्गत मूल्यमापनाच्या निकालाच्या आधारे अकरावीत प्रवेश घेतील त्यांना सामाईक परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरच प्रवेश मिळू शकणार आहे.
 
शिवाय, सामाईक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम एसएससी बोर्डाचा असल्याने सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी हे एक नवीन आव्हान ठरू शकतं.
8. अकरावीची प्रवेश परीक्षा कशी असेल?
ही सामाईक प्रवेश परीक्षा बहुपर्याय असणार आहे. म्हणजेच OMR परीक्षा पद्धतीनुसार प्रश्नपत्रिका अंतिम केली जाणार आहे. दोन तासांची ही वस्तूनिष्ठ परीक्षा असणार आहे. बहुपर्यायी उत्तरांची परीक्षा देण्यासाठी बहुतांश दहावीच्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची ही पहिलीच वेळ असू शकते. त्यामुळे दहावीच्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी घोषित करण्यात आलेली अकरावीची सामाईक प्रवेश परीक्षा आव्हानात्मक ठरू शकते.
 
एकाबाजूला नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा असल्याने सीईटीची परीक्षा देण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला या परीक्षेचे बदललेले पॅटर्न ऐनवेळी आत्मसात करण्याचंही टेंशन असल्याचं दहावीचे विद्यार्थी सांगतात.
 
9. खासगी किंवा फॉर्म 17 च्या माध्यमातून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय?
 
श्रेणीसुधार योजनेअंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून दोन परीक्षांच्या संधी मिळणार आहेत. या संधी फॉर्म 17 भरलेल्या विद्यार्थ्यांसाठीही लागू असतील.