बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जून 2018 (09:06 IST)

एसटीच्या तिकीटात येत्या 15 जूनपासून 18 टक्के वाढ

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात येत्या 15 जूनपासून 18 टक्के इतकी वाढ करण्यात येणार आहे. डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाने म्हटलं आहे.
 
याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला. उदाहरणार्थ, एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. तसेच आठ रुपये तिकीट असल्यास 10 रुपये तिकीटदर आकारला जाईल. इंधनाच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळावर दरवर्षी साधारण 460 कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीटदरात 30 टक्के इतकी वाढ करावी, असं महामंडळाने प्रस्तावित केलं होतं. पण प्रवाशांवर जास्त आर्थिक भार पडू नये यासाठी ही दरवाढ 30 टक्क्यांऐवजी फक्त 18 टक्के इतका करण्याचा निर्णय अंतिमत: घेण्यात आला. हा निर्णयही नाइलाजास्तव घेण्यात येत असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी सांगितलं.