मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (08:06 IST)

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडेंचा राजीनामा

पदावर राहून जर मला माझ्या ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देता येत नसेल तर पदावर राहण्याचा उपयोग काय? अशी खंत व्यक्त करत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आज अखेर तायवाडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. तशी माहिती तायवाडे यांनी नागपुरात दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनं नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्याने राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय.
 
ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता यावं यासाठी आपण ओबीसी महासंघाच्या वतीने काम केलं. मात्र आता सर्वोच न्यायालयाच्या निकालानंतर आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे मी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचं तायवाडे यांनी सांगितलं.आपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. आता आम्ही राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आणि मागणी पूर्ण झाली नाही तर देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशाराही तायवाडे यांनी यावेळी दिलाय.
 
दरम्यान, राजीनामा देणार असल्याचं तायवाडे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला होता.सध्या संपूर्ण राज्याचा ओबीसींचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपलेला आहे.राज्य शासन ओबीसींचे २७ टक्के आरक्षण अबाधित ठेऊ शकत नाही, असं मत तायवाडे यांनी व्यक्त केलं. तसेच ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासाठी केंद्र सरकारशी संघर्ष करत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.