गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (17:15 IST)

सत्ताधाऱ्यांना मराठी भाषेबद्दल ठराव मांडावा लागतो – सुनील तटकरे

राज्याच्या विधिमंडळात आज आपल्याला मराठी भाषेसंबंधी ठराव मांडायची वेळ का आली? मराठीचा ढोल बडवत गेल्या चार वर्षात जे लोक सत्तेवर बसले आहेत, त्यांना हा ठराव मांडावा लागत आहे, यापेक्षा जास्त नामुष्की मराठी भाषेवर ओढवली नाही, अशी टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी केली. विधानपरिषदेत सभापतींच्या मराठी भाषेच्या ठरावावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी तटकरे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

काल राज्यपालांच्या भाषणाचे मराठी भाषांतर झाले नाही. आज मराठी अभिमान गीतातील कवी सुरेश भटांच्या कवितेचे शेवटचे कडवे गाळण्यात आले. लोकराज्य मासिक गुजराती भाषेत सुरु करण्याची किमया याच सरकारच्या काळात झाली. स्व. बाळासाहेब असते, तर असे झाले नसते. एका बाजूला आपण बेळगावात कानडी सक्तीच्या विरोधात लढत आहोत, तर दुसरीकडे लोकराज्य गुजरातीत चालू करण्यास शिवसेना समर्थन करत आहे,यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही, असे ते म्हणाले.

शिवसेनेचे तीन खासदार केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले व त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत विनंती केली. मंत्र्यांनी स्पष्ट भाषेत नकार दिल्यावर तीनही खासदार निमूटपणे माघारी आले. अभिजात दर्जा मिळाला असता, तर सेनेने ढोल बडवले असते. पण सत्तेत असताना तोंडावर नकार मिळूनही चकार शब्दाचा निषेध नोंदवला नाही, याबाबत त्यांनी शिवसेनेवर टीका केली.