राज्यात गाजलेले घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन रुग्णालयात दाखल, पुढील उपचारासाठी पाठवणार मुंबईला
संपूर्ण राज्यात गाजलेले जळगाव जिल्ह्यातील घरकुल घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आलेले सुरेश जैन नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आज त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जैन यांच्या हृदयावर शस्रक्रिया झाली आहे, त्यांच्या अधिक तपासण्या करणे आवश्यक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त सिव्हील सर्जन निखील सैंदाणे यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, जळगाव घरकुल घोटाळाप्रकरणी धुळे विशेष न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी ४८ आरोपींना शिक्षा सुनावली. त्यानंतर आरोपींना जिल्हा कारागृहात नेण्यात आले आहे. प्रमुख आरोपी तथा माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह इतरांचा समावेश असून, जैन यांना सात वर्षे कारावास, १०० कोटींचा दंड न्यायालयाने सुनावला आहे. आज जैन यांच्या छातीत दुखू लागल्याने कारागृह रुग्णालयाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
त्यांच्या छातीत दुखत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर येथील तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या यावेळी करण्यात आल्या. जैन यांना मधुमेहाचा अधिक त्रास होत असून त्यांचा रक्तदाब देखील वाढला सोबतच, त्यांच्या हृदयाची शस्रक्रियादेखील झालेली असल्यामुळे त्यांचा त्रास वाढल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांच्या अधिक तपासण्या होणे आवश्यक असून त्यांना त्यासाठी मुंबईतील जे जे अथवा केईएम रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठवणार असल्याची माहिती अतिरिक्त सिव्हील सर्जन निखील सैंदाणे यांनी दिली आहे.