शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (09:11 IST)

कोरोना काळात नियम मोडणाऱ्या महापौर उषा ढोरे यांच्यावर कारवाई करा – खासदार डॉ. कोल्हे

पिंपरी-चिंचवडच्या  कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पिंपरी-चिंचवड भाजपच्या महापौर उषा ढोरे यांनी ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. या कार्यक्रमात सुरक्षित अंतर, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांप्रमाणे महापौर उषा ढोरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. या बाबत खासदार कोल्हे यांनी ट्विटही केले.
 
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर उषा ढोरे यांच्यावतीने चिंचवड येथे ‘फॅशन शो’चे आयोजन केले होते. कोरोनाचे नियम कडक केले असतानाही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नियमांचे कोणतेही पालन केले नाही. अनेकांनी मास्कही परिधान केला नव्हता. महापौर उषा ढोरे यांनीही मास्कविना रॅम्प वॉक केला. यावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरद्वारे महापौरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
खासदार डॉ. कोल्हे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आवाहनानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी आपले पुर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध जाहिर केले.  मात्र, पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या महापौर ढोरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष करत ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. हे अतिशय खेदजनक असल्याचे त्यांनी नमुद केले.