स्मशानात अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून मांत्रिकाकडून पूजा
साताऱ्यातील सुरूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीत पूजा केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून ही पूजा करण्यात आली. परंतु स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीत पूजा होत असल्याचा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी तसेच नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
या स्मशानभूमीत एक लाल शर्ट घातलेल्या तंत्रीकाने एका अल्पवयीन तरुणीवर बाहेरचे लागरी झाले असे सांगितल्याने स्माशानभूमीत हळदीकुंकवाचे गोलाकार रिंगण आखून त्याशेजारी अंडी, नारळ, लिंबू, काळी बाहुली ठेवून मुलीस केस मोकळे सोडून बसविल्याचे निदर्शनास आले. ग्रामसंस्थानी या बाबत मुलीसोबत आलेल्या नातेवाइकांना हटकले असता आमच्या मुलीस बाहेरची बाधा झाली असून ती काढण्यासाठी व कोंबडा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत असे यावेळी सांगण्यात आले. गोंधळ होत असल्याचे बघून या लोकांनी स्माशानभूमीतून पळ काढला.
हा धक्कादायक प्रकार वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीत घडला आहे. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत.