अनुदानित खासगी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी परीक्षा
राज्य सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या खासगी शाळांमधल्या शिक्षक भरतीसाठी यापुढे परीक्षा घेतली जाणार आहे. तसंच मेरिटनुसारच शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळं शिक्षक भरतीसाठी लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षण संस्थांना मोठा दणका बसणार आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती आता अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षण सेवकांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा (CET) रद्द करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या, अनुदानास पात्र असलेल्या शैक्षणिक व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत सुलभता आणण्यासह गुणवत्तेवर शिक्षकांची निवड व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.