शुक्रवार, 5 जुलै 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (20:37 IST)

जादा परताव्याचे आमिष दाखवून कंपनीने 93 जणांना 94 लाखांना फसविले

सोलापूर  :- गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून 93 जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या एका कंपनीने सोलापूरमधील 93 जणांची 94 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
 
या प्रकरणी पोलिसांनी अरविंद मेहता या संशयिताला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 23 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
 
गुंतवलेल्या रकमेला 45 दिवस पूर्ण झाल्यानंतर दरमहा 15 टक्के परतावा मिळेल. 12 महिन्यानंतर गुंतवलेली रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखवून नाशिक येथील दाते नगरातील दिव्यांजली अपार्टमेंटमधील मनी सिर्केट मल्टिट्रेड या कंपनीने सोलापुरातील 93 जणांना गंडा घातला आहे.
 
निलम नगरातील स्वाती लालूप्रसाद मुत्याल या गेंट्याल चौकातील वरदायिनी हॉस्पिटल येथे नोकरीला आहेत. त्यांचे पती मुंबईतील कंपनीत नोकरीला आहेत. त्यांच्या ओळखीच्या पुष्पा विभूते यांच्या घरी कामानिमित्त गेल्यावर तेथे गणेश चौंखडे व गणेश भोसले या दोघांशी ओळख झाली. चौंखडे व भोसले हे दोघे त्या कंपनीचे एजंट होते.
 
त्यावेळी त्यांच्याकडून फिर्यादी स्वाती मुत्याल यांना नाशिकच्या मनी सिर्केट मल्टिट्रेड कंपनीबद्दल माहिती मिळाली. त्या एजंटांनी कंपनीची स्किम फिर्यादी व त्यांच्या पतीला समजावून सांगितली. त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 29 ऑगस्ट 2019 या सात महिन्यात फिर्यादी स्वाती मुत्याल यांच्यासह इतर 92 जणांनी या कंपनीत 94 लाखांहून अधिक रक्कम गुंतवली. सुरूवातीला काही मोबदला दिला गेला, पण शेवटी कंपनीने 93 लाख 94 हजार 400 रुपये परत दिलेच नाही.
 
अखेर स्वाती मुत्याल यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले आणि सचिन सुधाकर वरखडे (रा. ओम नगर, जेलरोड, नाशिक), अमोल नरेंद्र खोंड व अरविंद मेहता (दोघेही रा. नाशिक) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल  केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून त्यातील मेहताला जेरबंद केले आहे.
 
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मोहन पवार तपास करीत आहेत.