नाशिकमधील आयएसपी आणि सीएनपी प्रेसचा चेहरामोहरा लवकरच बदलणार
नाशिकमधील नाशिकरोडच्या आयएसपी आणि सीएनपी या प्रेसचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. दोन्ही प्रेसची स्पर्धाक्षमता आणि कामाचा दर्जा अधिकच वाढणार आहे. आयएसपी आणि सीएनपी या दोन्ही प्रेससाठी जपान व ऑस्ट्रियामधून 12 अत्याधुनिक मशीन खरेदी करण्यात येणार आहे. एकूण सुमारे 550 कोटींच्या या मशीनरी खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
नवीन मशीनरी डिसेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. नोट प्रेसमध्ये आठ आणि आयएसपीमध्ये चार नवीन मशीनरी सुरू झाल्यावर दर्जा वाढणार आहे. त्या आल्यानंतर जुन्या मशीनरी लगेच बाद न करता तीन वर्षे कायम ठेवल्या जातील. ऑस्ट्रियामधून 208 कोटींच्या चार सुपर सायामल्टन मशीन येतील. त्यातील तीन नोट प्रेसमध्ये, तर एक आयएसपीमध्ये लावली जाईल. जपानहून 60 कोटींची एक इंटग्लियो, 60 कोटींच्या दोन कट ण्ड पॅक, 90 कोटींच्या तीन नंबरिंग मशीन्स नोट प्रेसमध्ये लागतील. ई-पासपोर्ट छपाईसाठी आयएसपीमध्ये 54 कोटींचे मशीन येईल. प्रेसमध्ये वर्षाला दीड कोटी ई-पासपोर्टची ऑर्डर मिळाली असून, त्यापैकी 14 लाख ई-पासपोर्ट छापून तयार आहेत.
Edited By-Ratnadeep Ranshoor