बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (20:15 IST)

पोलीस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी, अशा झाल्या आहेत बदल्या

राज्यातील पोलीस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिय आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत. 
 
नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी (कायदा व सुव्यवस्था) निवड झाली आहे. त्यांच्या जागेवर पुणे-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दीपक पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक रेंजच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. याशिवाय पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांचीही अमरावतीच्या आयुक्तपदी बढतीवर बदली झाली आहे.
 
पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.
 
नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे..