मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (15:32 IST)

अधिकाऱ्यानं महिला साईभक्तांना अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले

एका धक्कादायक घटनेत शिर्डी साईबाबा संस्थानच्या एका जनसंपर्क विभागातल्या अधिकाऱ्यानं काही महिला भक्तांना मोबाईलवरुन अश्लील मेसेज पाठवले आहेत. या प्रकरणी आता तक्रार करण्यात आली आहे. महिला साईभक्ताने जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने फोनवर अश्लील फोटो तसेच व्हिडीओ पाठवल्याची लेखी ‌तक्रार साईबाबा संस्थानकडे ‌केल्याची धक्कादायक बाब‌ समोर आली आहे.
 
महिलांनी आसाम आणि मुंबईतल्या संस्थानकडे ही तक्रार केल्याचं समजतंय. या प्रकरणाची आता सखोल चौकशी केली जाणार असून स्थानिक शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. गैरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या संघटक स्वाती परदेशी यांनी केली आहे. त्यांनी साईबाबा ‌संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे निवेदन पाठवले आहे.
 
स्वाती परदेशी यांनी निवेदनात म्हटलंय की आरती आणि दर्शनाच्या नावाखाली जनसंपर्क कार्यालयातील एका अधिकाऱ्याने मुंबई तसेच आसाम, गुवाहाटी येथील साईभक्त महिलांशी जवळीक तयार केली. नंतर मोबाईलवरुन अश्लिल मेसेज आणि व्हिडिओ पाठवले. या संदर्भात सदर महिलांनी संस्थानकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबधित जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याची सखोल चौकशी करुन कारवाई व्हावी.
 
या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच तदर्थ समितीचे अध्यक्ष प्रधान जिल्हा न्यायाधीश आणि अहमदनगरचे पोलीस प्रमुखांना पाठवण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितलं आहे.