शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2022 (10:17 IST)

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

eknath uddhav
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार यांच्यातला वाद आता न्यायालयात गेला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटानेदेखील आक्रमक भूमिका घेऊन न्यायालयात धाव घेतली असून आमदारांच्या निलंबनाची मागणी आणि गटनेता बदलण्याला विरोध दर्शविला आहे. शिंदे गटाने दाखल केलेल्या या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
 
40 बंडखोर आमदारांची परतण्याची शक्यता मावळल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नव्याने पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच 16 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.
 
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. याच मागणीची दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावली असून कारवाई का करू नये याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच शिवसेनेने आपला गटनेता बदलून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना नियुक्त केले आहे. याविरोधातच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 
याआधी जे गेले ते परत निवडून येणार नाहीत, असे म्हणत "बंडखोरांनी परत मुंबईत येऊन दाखवावं," असे आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच "बरं झालं घाण गेली," म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना परत पक्षात घेणार नसल्याचे संकेत दिले.
 
एकनाथ शिंदे गटाची बाजू देशातले नामांकित वकील हरीश साळवे मांडणार आहेत तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडतील.
 
एकनाथ शिंदे यांच्या गोटातल्या आमदारांची संख्या 47 झालीय. यात शिवसेनेचे 38 आणि इतर 9 आमदार आहेत. यात 8 जण कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत. कालपर्यंत शिवसेनेच्या सर्व बैठकांमध्ये सहभागी होत असलेले कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंतही गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिंदे गटातील दोन आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख हे मात्र परतले आहेत.
 
एकनाथ शिंदे गटाकडून आमदार दीपक केसरकर यांनी भूमिका मांडली आहे, "आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. भारतीय जनता पक्ष अथवा इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनेतच राहून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार आहे.
 
"आमदारांना पाठवलेल्या नोटिसमध्ये त्यांना सोमवार संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पण ही मुदत कायद्यानुसार नाही. आमदारांना अपात्र ठरवण्याआधी सात दिवसांची मुदत द्यावी लागते. तरीही आमदारांना अपात्र ठरवल्यास आपण कोर्टात धाव घेऊ अशी भूमिका एकनाथ शिंदे गटाने घेतली आहे," असं केसरकर म्हणाले.
 
ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्या मते, "हे प्रकरण कोर्ट कचेरीत जाण्यापासून टाळण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर आमदारांना एखाद्या नोंदणी झालेल्या पक्षात विलीन व्हावं लागेल. दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असल्याने ही कृती वैध असेल."
 
"पण, यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे नेते इथून पुढे शिवसेनेचे राहणार नाहीत. हा निर्णय या सगळ्यांना मान्य असेल का हे त्यांना पाहावं लागेल. पण, शिवसेना सोडायची नसेल तर एकनाथ शिंदे यांच्यासमोर मार्ग उरतो तो विधानसभेत शिवसेनेचा अधिकृत गट म्हणून मान्यता मिळवण्याचा. कारण, त्यांच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे. पण, हा निर्णय नक्कीच कोर्टात आणि विधिमंडळातही लढवावा लागेल. त्यासाठी कायदेशीर अभ्यास त्यांच्या गटाला करावा लागेल," बापट सांगतात.
 
एकनाथ शिंदेंकडे सध्या 39 आमदारांचा पाठिंबा आहे. फ्लोअर टेस्टमध्ये आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे किमान 37 आमदारांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे.
 
सध्याच्या संख्याबळानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53, काँग्रेसचे 44 तर शिवसेनेचे 20 असं एकूण 117 संख्याबळ महाविकास आघाडीकडे उरेल.
 
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाकडे 106 इतकं संख्याबळ आहे. याव्यतिरिक्त काही अपक्ष आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्यास अपक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल.
 
गुलाबराव पाटील पुन्हा पानटपरीवर बसतील- संजय राऊत
"गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील," अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांवर राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. दहिसर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
 
राऊत म्हणाले, "गुलाब पाटील हे असे भाषण करायचे की शिवसेनेमध्ये कोणी वाघच नाही, जणू हे एकटेच वाघ असल्यासारखे ते वागायचे मात्र, ते पळून गेले. ते म्हणायचे की, मी पानटपरीवाला मला कॅबिनेट मंत्री केलं आता तुम्हाला पुन्हा पानटपरीवर बसावं लागेल. हे महाभारतातल्या संजयचे वक्तव्य आहे. हे लक्षात ठेवा. मी बाळासाहेबांच्या पायाशी बसून सुमारे 30 वर्षं काम केलं आहे. माझा शब्द कधी खोटा होत नाही."
 
"संदिपान भुमरे यांना पहिलं तिकीट मिळालं तेव्हा ते पैठणच्या साखर कारखान्यात वॅाचमन होते. मोरेश्वर सावेंचं तिकीट कापून बाळासाहेबांनी साधा शिवसैनिक म्हणून त्यांना तिकीट देण्यात आल होतं. तेव्हा त्यांना हॅाटेलमध्ये वडा-सांबर सुद्धा खाता येत नव्हतं. ते जमिनीवर बसून खायचे. मात्र, ते आज कॅबिनेट मंत्री आहेत," असं राऊत म्हणाले.