रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (12:27 IST)

घरासाठी लढत असलेल्या महिलेने आंदोलनस्थळीच दिला बाळाला जन्म

बीड- गेल्या 10 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या एका महिलेनं आंदोलनस्थळीच बाळाला जन्म दिला आहे. या घटनेनंतर पोलीस पथक रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले असता महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांची मदत नाकारली आणि लढा सुरूच आहे. त्यांनी सरकारी उपचार नाकारले आहेत.
 
मनीषा विकास काळे असं मातेचं नाव आहे. 23 वर्षीय महिला पारधी समजातील असून गेल्या दहा दिवसांपासून बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत उपोषणात त्यांचे चुलते अप्पाराव भुजा पवार आणि पती विकास काळे देखील साथ देत आहे. गर्भवती महिला गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत असून देखील प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं गेलं असून अशा अवस्थेत मनीषा यांनी गुरुवारी पहाटे आंदोलनस्थळीच बाळाला जन्म दिला आहे.
 
बीड जिल्ह्यातील वासनवाडी शिवारात अप्पाराव पवार राहतात. त्यांची पुतणी मनीषा विकास काळे ह्या देखील पतीसह त्यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. काही दिवसांपूर्वी अप्पाराव यांना घरकुल मंजूर झालं असून देखील ग्रामपंचायत घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देत नाहीये. यामुळे अप्पाराव हे आपल्या कुटुंबासह 24 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.