काही लोक आहेत ज्यांना वाटतं आहे की हे आंदोलन सुरुच रहाव : फडणवीस
पंजाब, हरयाणामधल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा मोदी सरकारने सुरु केली. ती चर्चा करताना पहिल्यांदा शेतकऱ्यांनी काही सुधारणा सुचवल्या. सरकारने त्या मान्य केल्या, त्यानंतर त्यांनी सरकारकडे हे आश्वासन लेखी मागितलं ती मागणीही मान्य झाली. त्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी भूमिका बदलली आणि सांगितलं की कायदेच आता रद्द करा. याचा अर्थ काय? की आंदोलकांमध्ये एक समूह असा आहे ज्याला मार्ग नाही काढायचा. ज्यांना वाटतं आहे की शेतकरी आंदोलनातून मार्ग निघायलाच नको. त्यांच्यामागे कोण आहे हे देखील शोधलं गेलं पाहिजे असं विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपण हे पण पाहिलं आहे की कशाप्रकारचे लोक तिथे पोहचले आहेत. बिहारचा जर विचार केला तर आपण पाहिलं की तेजस्वी यादव म्हणाले की आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र बिहारने तर APMC च रद्द केल्या आहेत. या कायद्यांमध्ये ती तरतूद नाही… तरीही ते विरोध करत आहेत. आंदोलक चुकीचे आहेत, त्यांचा मार्ग योग्य नाही असं मला म्हणायचं नाही. मात्र काही लोक आहेत ज्यांना वाटतं आहे की हे आंदोलन सुरुच रहावं असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.