शुक्रवार, 12 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (22:18 IST)

'हे' वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे : अजित पवार

'This' news is baseless
आयकर विभागाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या १ हजार कोटी किंमतीच्या मालमत्ता जप्त करण्याची नोटीस काढण्यात आल्याचे समोर आलं होत. आयकर विभागाच्या कारवाई संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण आलं आहे. अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात आणि कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.