जळगावात वाहनावर झाड पडल्याने दोन पोलिस ठार, तीन जखमी
Jalgaon News उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या वाहनावर मोठे झाड कोसळून दोन पोलिस ठार तर तीन पोलिस सहकारी जखमी झाले. ही घटना एरंडोल-कसौदा रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी या घटनेची माहिती दिली.
दोन पोलिसांचा मृत्यू
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर (36) आणि पोलिस नाईक अजय चौधरी (38) अशी मृतांची नावे आहेत, ते जळगाव पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) तैनात होते, असे त्यांनी सांगितले.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, EOW टीम एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी जात असताना ही घटना घडली.
पोलिसांचे वाहन अंजनी धरण परिसरातून जात असताना त्यांच्या वाहनावर एक मोठे व जुने चिंचेचे झाड पडले. त्यात प्रवास करणारे पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. दातीर आणि चौधरी यांना नंतर मृत घोषित करण्यात आले, असे ते म्हणाले.
तीन जखमी पोलिसांवर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.