मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नाणार होणार नाही: उद्धव ठाकरे

नाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची राख केल्याशिवाय राहणारा नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावलं. माझ्या कोकणाला, इथल्या कोकणी माणसाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला उद्ध्वस्त करू, अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रिफायनरीची आधिसूचना रद्द केली आहे. आता रिफायनरी होणार नाही नाणार वासियांनी आता आनंदोत्सव साजरा करा. नाणार राहणार प्रकल्प गेला, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका खणखणीत शब्दात मांडली. ते   नाणारमध्ये जाहीर सभेत बोलत होते.
 
हा प्रकल्प आणण्यासाठी सरकारचा आटापीटा का सुरू आहे याचं कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, इथल्या जमीनी गुजराती जैन-शहा यांनी अगदी कवडीमोल भावात खरेदी केल्या आहेत. त्यांना चांगला मोबदला मिळावा म्हणून हा प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्यात येत आहे. तसंच हा प्रकल्प गुजरातला नेण्याची भीती दाखवली जात आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातला घेऊन जायचा असेल तर खुशाल घेऊन जा, तिथे जैन-शहा यांना मांडीवर घेऊन कुरवाळत बसा. मात्र माझ्या कोकणी माणसाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.