गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (18:21 IST)

उद्धव ठाकरे : 'राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा, खासदारांचा दबाव नाही'

uddhav thackeray
भारताच्या राष्ट्रपतिपदाच्या भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत शिवसेनाभवनात पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली.
 
द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांचा दबाव असल्याचे वृत्तही यावेळी उद्धव ठाकरेंनी फेटाळलं.
 
गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त येत होते की, द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंवर दबाव आणला आहे.
 
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आज मी स्वत:हून बोलतोय, कारण काही बातम्या विचित्रपणे जनतेसमोर गेल्या. स्पष्ट शब्दात सांगतो की, काल खासदारांच्या बैठकीत दबाव आणला नाही. हा निर्णय आपला आहे, आपण द्याल तो आदेश, असं सगळ्यांनी सांगितलं."
 
तसंच, "गेल्या चार-पाच दिवस माझ्या शिवसेनेतल्या, विशेषत: आदिवासी समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली. एकलव्य संस्थेचे शिवाजीराव ढवले, विधानपरिषदेतील आमदार आमशा पाडवी, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला गावित, तसंच एनटी-एसटी समाजातील कार्यकर्त्यांनी विनंती केली की, आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याची संधी मिळतेय, तर आपण पाठिंबा दिला तर आम्हाला आनंद होईल. या गोष्टींचा, विनंतीचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे," असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
 
यावेळी उद्धव ठाकरेंनी यापूर्वी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जींना दिलेल्या पाठिंब्यांची आठवण करून दिली.
 
ते म्हणाले, "ज्यावेळी राष्ट्रपतिपदासाठी प्रतिभा पाटील यांचं नाव आलं, तेव्हाही शिवसेनाप्रमुखांनी देशाचा विचार केला. प्रणव मुखर्जींनाही तसाच पाठिंबा दिला होता. त्याच परंपरेने आणि शिवसैनिकांचा आग्रहाने हा पाठिंबा दिला."
 
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपर्दीमुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला.
 
त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे.
 
त्यांनीशिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणातउडी घेतली.
 
त्या 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या.
 
तत्पूर्वी1997 मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून 1997 त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या.
 
नंतर त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली.
 
त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या.
 
त्या राष्ट्रपती झाल्या तर आदिवासी समुदायाला एक मोठं स्थान देशाच्या राजकारणाला मिळेल. तसंच ते नरेंद्र मोदींची प्रतिमेला उजाळा देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
 
विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे करण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांकडून शरद पवार, फारुख अब्दुल्ला यांचं नाव समोर आलं होतं. मात्र दोघांनीही त्याला नकार दिला होता.