शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:29 IST)

भाजप प्रवेशाचे ‘ऑफर लेटर’ घेऊन आम्ही फिरत नाही; फडणवीसांचा पलटवार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती,असा खळबळजनक गौप्यस्फोट महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.त्यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफांच्या गौप्यस्फोटावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? असे ऑफर लेटर घेऊन आम्ही फिरत थोडी असतो, असं म्हणत मुश्रीफांचा दावा खोडून काढण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला.
 
चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपत येण्याची ऑफर दिली होती,असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्याच्याही पुढे जाऊन मी भाजपची ऑफर नाकारली म्हणून मला त्रास देण्यासाठी माझ्यावर ईडीच्या धाडी वगैरे टाकल्या, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी मुश्रीफांवर पलटवार केला आहे.
 
हसन मुश्रीफ साहेबांना भाजपमध्ये येण्याची कुणी ऑफर दिली,असा सवाल करताना असे ऑफर लेटर घेऊन आम्ही थोडी फिरत असतो, असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत,कुणालीही देण्याकरिता,असा पलटवार फडणवीस यांनी केला.
 
मुश्रीफ आता काहीतरी बोलतायत. घोटाळ्याच्या आरोपावरुन लक्ष हटविण्यासाठी त्यांनी आता भाजपची ऑफर होती,असं सांगितलं आहे. त्यांनी अशी कोणतीही कुणीही ऑफर दिलेली नाही,असं परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.