शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (21:28 IST)

मनसैनिकांनी घेतली शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शपथ

मनसेनं  शिवाजी पार्कवर तिथीनुसार शिवजयंती सोहळ्याचं आयोजित  केला.  त्यानिमित्तानं शिवाजी पार्कचा संपूर्ण परिसर हा भगव्या झेंड्यांनी भगवामय झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवत मनसैनिकांना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शपथ दिली.
 
आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे शिवतीर्थावर जमलो आहोत. मी आज आपल्या सर्वांना आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी इथे शिवजयंतीच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना पक्षातर्फे एक शपथ देणार आहे. ती शपथ तुम्ही माझ्या बरोबरीनं बोलायची आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी सर्व मनसैनिकांना शपथ दिली.
 
राज ठाकरेंनी दिलेली शपथ जशीच्या तशी
आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावे. म्हणून सर्व जण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. हे सुराज्य स्थापन करताना जाती-जातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहील. युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मूल शाळेत जाऊन शिकत असेल. लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल. इथली शहरं, गावं, पाडे, तांडे सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील. भ्रष्टाचार नष्ट होईल. आमच्या शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल. कामगारांना न्याय मिळेल. यासाठी जे पडेल ते करू, छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी, स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू. आम्ही महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो.