1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जून 2022 (15:31 IST)

विखे पिता-पुत्रांना नक्की काय म्हणायचंय? राजकीय जोरदार वर्तुळात चर्चा

Radha Krishna Vikhe
राज्यात शिवसेना व भाजप यांच्यातील राजकीय वैमनस्य टोकाला पोहोचल्याची प्रकरणं वारंवार समोर येत असतात. आता भाजप खासदार सुजय विखे आणि माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा हे दोन पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पिता-पुत्रांना यातून नक्की काय सांगायचे आहे, याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
 
‘शिवसैनिकांशी आपले वैर नाही, आपल्या खासदारकीमध्ये त्यांचा ५० टक्के वाटा आहे. त्यामुळे शिवसैनिकांना कधीही विसरणार नाही. त्यांची साथही कधी सोडणार नाही,’ अशी भूमिका भाजप खासदार सुजय विखे यांनी जाहीरपणे मांडली. तर दुसरीकडे त्यांचे वडील माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनीही आपली भूमिका मांडत ‘अजित पवार यांनी परत यावे आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणावे’ अशी साद घातली आहे. एकाच दिवशी विखे पिता-पुत्रांनी दोन स्वतंत्र ठिकाणी केलेल्या या वक्तव्यांची जिकडेतिकडे चर्चा रंगली आहे. शिवाय, भाजप खासदार सुजय विखे शिवसेनेसोबत जवळीक निर्माण करण्याबाबत बोलत असून त्यांचे वडिल मात्र पवारांना भाजपबाबत भावनिक साद घालत आश्चर्यही व्यक्त केले जात आहेत.
 
मागील काही दिवसांपासून खासदार विखे अहमदनगर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन भाजपपेक्षा वेगळी, आपल्या सोयीनुसार भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार ही भूमिका सुसंगत असली, तरी भाजपच्या भूमिकेशी सुसंगत आहे का, असा प्रश्न त्यांच्या वक्तव्यांमुळे उपस्थित केला जात आहे. नगर शहरात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी सलगी ठेवली आहे.
 
तसेच नगर शहरातील काँग्रेसचे नगरसेवक पक्षाच्या भूमिकेपेक्षा विखे यांच्या संपर्कात जास्त दिसून येतात. त्यामुळे या राजकीय गुंतागुंतीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जात आहे. पवार कुटुंबीयांशी विखे यांचे परंपरागत राजकीय वैमनस्य आहे. सध्या मात्र या वैमनस्याला खा. विखे यांनी आमदार रोहित पवार यांच्यापुरता लगाम घातला आहे. पण परिसरातील शिवसैनिकांशी मात्र विखेंकडून ठरवून जवळीकता साधली जात आहे. यातून महाविकास आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का अशाही चर्चांना उधान आले आहे.
 
राज्यातल्या राजकारणातले दिग्गज नेते स्व. बाळासाहेब विखे यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आपला स्वतंत्र गट कार्यरत ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हा विकास आघाडीचा प्रयोग राबवला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत खासदार सुजय विखेंनी अशा प्रयोगासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसते आहे. येत्या काळात याविषयी अधिक स्पष्टता येईलच. शिवाय शिवसेनेशी जवळीक आणि अजित पवारांनी घातलेली साद यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणंदेखील महत्त्वाचं असणार आहे.